सातारा : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना २०२५’ चा प्रारंभ कुमठे (ता. कोरेगाव) येथे पुणे विभागीय कृषी आयुक्त कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी गोविंदराव मोरे यांच्या हस्ते बांधावर नारळ लागवड करून करण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यातील किमान दोन गावांत १०० शेतकऱ्यांच्या ऊस शेताच्या बांधावर नारळ लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार कोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने कुमठे व तडवळे संमत कोरेगाव ही दोन गावे निवडली आहेत.
कुमठे येथे प्रगतशील शेतकरी दिग्विजय जगदाळे यांच्या ऊसशेताच्या बांधावर नारळ लागवडीचा प्रारंभ श्री. मोरे यांच्या हस्ते, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी संदीप राजाळे, उपकृषी अधिकारी अर्जुन भोसले यांचा सत्कार श्री. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रगतशील शेतकरी सत्यवान शिंदे यांच्या गुलाब लागवड क्षेत्राची, धनाजी जगदाळे यांच्या आधुनिक पद्धतीच्या कांदा चाळीची पाहणी अधिकारी, पदाधिकारी यांनी केली. यावेळी नायब तहसीलदार उदयसिंह कदम, लालासाहेब गावडे, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत साळुंखे, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, भानुदास जगदाळे, धनंजय जगदाळे आदी उपस्थित होते.