इथेनॅाल मिश्रणाबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता : राजू शेट्टी

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे कि, देशातील क्रुड ॲाईल आयात करणारे मुठभर दलाल,नोकरशहा तसेच काही वाहन कंपन्या इथेनॅाल वापराबाबत गैरसमज पसरवून इथेनॅाल मिश्रणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था तसेच वायू प्रदुषणावर विपरीत परिणाम होवून देशातील ५ कोटी ऊस उत्पादक तसेच १.५० कोटी मका उत्पादक शेतक-यांच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले.

माजी खासदार शेट्टी म्हणाले कि, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे इथेनॉल उद्योगास चालना मिळाली. आज देशामध्ये जवळपास १६८५ कोटी लिटर इथेनॅाल उत्पादनाची क्षमता आहे. यामध्ये ९४१ कोटी लिटर उसापासून तर ७४४ कोटी लिटर मक्का व इतर धान्यापासून निर्मिती केली जाते. २०१५ साली मी पेट्रोलियम स्थायी समितीचा सदस्य असताना प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीने इथेनॉलबाबत अभ्यास करून बीआईएस व एआईएस वाहनांमध्ये संशोधन करून इथेनॉल वापराबाबतचा सकारात्मक अहवाल देण्यात आला होता. केंद्र सरकारने तो अहवाल स्वीकारून सध्याचे इथेनॅाल संदर्भातील धोरण जाहीर केली.

इथेनॅाल उत्पादनाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची जवळपास १ लाख ४४ हजार कोटीचे परकीय चलन वाचले आहे. देशामध्ये प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली असताना इथेनॅाल वापरामुळे ७३६ लाख टनांनी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटले आहे. सदरच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी देशभरात जवळपास ३० कोटी झाडांची वृक्ष लागवड करणे गरजेचे होते. देशात जवळपास ४० हजार कोटीपेक्षा जास्त रूपयाची गुंतवणूक इथेनॅाल उद्योगात झाली आहे. देशातील अर्थव्यवस्था ढासळत असताना क्रुड ॲाईल आयातीचे प्रमाण कमी झाल्याने परकीय चलनाच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. इथेनॉल मिश्रणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.

‘चीनीमंडी’शी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले कि, काही क्रुड ॲाईल आयात करणारे दलाल तसेच वाहन कंपन्यांना हाताशी धरून चुकीच्या माहितीचा प्रपोगंडा करून मंत्री गडकरी यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडकरींनी स्वत:च्या स्वार्थासाठी इथेनॅालचा धोरण ठरविले असल्याचा भास निर्माण केला जातोय. अशा अपप्रवृत्तीमुळे देशातील शेतकरी, साखर आणि इथेनॅाल उद्योग व अर्थकारणावर मोठा गंभीर परिणाम होणार असून सामान्य जनतेला याची फळे भोगावी लागणार असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here