पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनच्या तांत्रिक परिषदेच्यावतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साखर कारखाना चालवत असताना काळाची पावले ओळखून निर्णय घेणे आवश्यक असते. कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जावून मार्गदर्शन केले जाते. प्रतिएकर ऊस उत्पादन खर्च कमी करून ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी ‘थोडेसे बदला एकरी १०० टन उत्पादन मिळवा’ ही योजना राबविली जाते, याची नोंद घेऊन हा पुरस्कार मिळाला आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीनाथ कारखान्याचे पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष रासकर, ‘विस्मा’चे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक, अजित चौगुले, कार्यकारी संचालक माधव राऊत, महेश करपे, हेमंत करंजे, अनिल बधे, ज्ञानदेव कदम, भगवान मेमाणे, मुकुंद दरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, आर. एस. शेवाळे, एस. बी. टिळेकर, ए. बी. शेंडगे, डी. एस. रोडे, बी. एन. होलगुंडे, व्ही. पी. होले आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणप्रसंगी सहकारमंत्री पाटील म्हणाले की, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) राज्यातील १३३ खासगी साखर कारखान्यांची शिखर संघटना आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील खासगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक कारखान्यांना सन्मानित केले आहे ही स्पृहणीय बाब आहे.