अहिल्यानगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याचा २०२४-२५ चा गळीत हंगाम संपून ८ महिने होत आले तरी गाळप केलेल्या उसाची बिले संबंधित शेतकऱ्यांना अद्याप अदा झालेली नाहीत. याबाबत वारंवार मागणी करून पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शेवगाव येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार आकाश दहाडदे यांना देण्यात आले आहे.
ऊस गाळप होऊन सात ते आठ महिने उलटून गेले तरी ऊस बिलाचा एकही हप्ता मिळालेला नाही. बँकांचे कर्ज, खत-बियाण्यांचा खर्च, घरखर्च या सगळ्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. कारखान्याने वेळोवेळी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. पण कारखाना व्यवस्थापनाकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे, सुभाष लांडे, मेजर अशोक भोसले, अमोल देवढे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर, नानासाहेब कातकडे, दादा पाचरणे, भागवत अंबादास, हरिभाऊ कबड्डी, मच्छिंद्र डाके, उस्मान सय्यद आदी उपस्थित होते.