बेळगाव : माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिद्धनाथ साखर कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्यावर्षी कारखान्यात दररोज ८ हजार ५०० मेट्रिक टनाप्रमाणे ऊस गाळप झाला होता. यावेळी ११ हजार टन ऊस गाळप होईल. इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची क्षमता दीडशे केएलपीडीवरून दोनशे केएलपीडीवर पोहोचवली आहे. आता धान्यापासून इथेनॉल निर्मिती होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २५) दुपारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली.
यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, कारखान्याचे कर्ज वाढत असले, तरी त्या प्रमाणात दरवर्षी नुकसानीच्या प्रमाणात घट होत आहे. इथेनॉल प्रकल्पावर ११० कोटींची गुंतवणूक झाली, तरी त्यातून २१० कोटीचे उत्पादन झाले आहे. सध्या वर्षाला १०० कोटींवर व्याज भरावे लागत असले, तरी तुलनेत उत्पन्न आहे. उपपदार्थ निर्मितीवर भर दिला आहे. राखेपासून वीट प्रकल्प साकारला जाईल. मळीपासून बायोगॅस निर्मितीचे नियोजन आहे. सभासद, कामगारांची अपघाती विमा योजना ५ लाखावरून १० लाखांची असेल. श्रीकांत बत्रे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष पवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. ‘हिरा शुगर’चे अध्यक्ष बसवराज कलट्टी, उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी, हालशुगरचे संचालक अप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, जयकुमार खोत, प्रकाश शिंदे, रामगोंडा पाटील, रमेश पाटील, रावसाहेब फराळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. जयवंत भाटले यांनी आभार मानले.