कोल्हापूर : ‘दत्त-शिरोळ’ने ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा- जय शिवराय किसान संघटनेची मागणी

कोल्हापूर : उसाचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढला आहे. ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना व वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वाढ देण्यात येत आहे. मात्र, यावर्षी साखरेला चांगला दर मिळाल्याने आणि उपपदार्थापासून मिळालेल्या उत्पन्नातून दत्त शेतकरी साखर कारखाना व्यवस्थापनाने गेल्या गळीत हंगामात आलेल्या उसास ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी येथील दत्त शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्याकडे निवेदन दिले.

जय शिवराय संघटनेने कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांना सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस दरवाढ देताना साखर कारखाने व केंद्र सरकार कानाडोळा करत आहेत. गेल्या वर्षभरात साखरेचे दर ३८०० ते ३९०० रुपये यांदरम्यान राहिले. तसेच उपपदार्थापासूनही कारखान्यांना चांगला मोबदला मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पाचशे रुपये दर देण्याची गरज आहे. दरम्यान, जे ऊसतोड मजूर नियमानुसार वाड्यात कांड्या न ठेवता, उसाच्या जादा कांड्या ठेवल्या तर, त्या ऊसतोड मजुरांवर कारवाई करावी, अशी ही मागणी जय शिवराय संघटनेने केली. ऊसतोड मजूर, ऊस तोडताना वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांड्या राखतात. शेतकऱ्याचे प्रतिएकर किमान तीन ते पाच टनाचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here