पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन विक्रीला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे कारखाना सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी (ता.26) राज्य मंत्रीमंडळांची साप्ताहिक बैठक झाली. या बैठकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याला जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक अनियमितेमुळे तोट्याच्या गर्तेत सापडलेला यशवंत कारखाना हा मागील चौदा वर्षापासुन बंद आहे. कारखाना मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मदत लागणार आहे.
यशवंत कारखान्यावरील कर्जे, शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले, कामगारांचे थकीत पगार, शासनाची विविध देणी, व्यापारी देणी व इतर देय देणी देण्यासाठी तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी कारखान्याला भरीव निधीची गरज आहे. हा लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी जमीन विक्री करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी एकमताने घेतला होता. त्यानंतर राज्य सहकारी बँकेकडे तारण असलेल्या कारखान्याच्या मालकीच्या जमीनीपैकी 99.27 एकर जमिनीची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीला करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला होता.
त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना यांच्या संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत 99.27 एकर जमीन 299 कोटी रुपयांना विक्री करण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या जमीन विक्रीच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल बोलताना कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, मंत्रिमंडळाने कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांचेही आभारी आहोत. तसेच कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.