अहिल्यानगर : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेवगाव तालुक्यातील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शासन हमीवर कर्ज देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे केदारेश्वर कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे म्हणाले की, केदारेश्वर कारखान्याला कर्ज मिळावे असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी राज्य सहकारी बँकेकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाच्या थकहमीची गरज होती. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यशासनाने थकहमी दिल्याने आता कारखान्या समोरील अडचणी दूर झाल्या आहेत.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘केदारेश्वर’ ने राज्य सहकारी बँकेला पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस उत्पादकांना पैसे देण्यास कारखान्याला अडचण निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली होती. कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे हे असून, कारखान्याचा सर्व कारभार हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे हे पाहतात. केदारेश्वर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केल्याने कारखान्याला कर्ज मंजूर झाले आहे.