कोल्हापूर : जिल्ह्यात साधारण पंचवीस हजार हेक्टर आडसाली उसाचे क्षेत्र असते. तर शिरोळ, हातकणंगले पूर्व भागासह जिल्ह्यात सर्वत्र जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान आडसाली उसाच्या लावणी केल्या जातात. यावर्षी टप्प्याटप्प्याने पाऊस पूरक प्रमाणात लागला आहे. सद्यस्थितीत पंचगंगा व भोगावती नदीकाठच्या आडसाली लागणी पुरामुळे अडचणीत आल्या असून, दुबार लावणीचे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ हजार हेक्टर आडसाली उसाची लागण पूर्ण झाली आहे. साधारण २३ हजार ते २५ हजार हेक्टर उसाच्या आडसाली लागणी होतील, असा अंदाज आहे.
यंदा १४ मेपासून पावसाने सुरुवात केली. यामुळे जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले पूर्व भागासह सर्व तालुक्यांत एकूण चौदा हजार हेक्टरवर आडसाली ऊस लावण झाली आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी ८६०३२, १०००१, १५०१२, १३००७ ,१५०६, अशा उसाच्या जातीचा वापर केला जात आहे. यंदा टप्प्याटप्प्याने लागणारा पाऊस माळरानावरील ऊस लावणीसाठी पूरक ठरला आहे. तर सध्या अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. यामध्ये पंचगंगा भोगावती व अन्य नदीवरील नदी काठावरील उसाच्या लागणी पुराने गेल्या आहेत. यामुळे या लागणीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे हंगाम पुढे गेला आहे. नदीकाठावरील आडसाली लावणी पूर आणि अतिवृष्टीने खराब झाले आहेत. पंचनामे करावे, तातडीने नुकसानभरपाई मिळावी असे कोपार्डेतील हनुमान विकास संस्थेचे अध्यक्ष सागर शामराव पाटील यांनी सांगितले.