पुणे : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४- २५ या हंगामात गळीत झालेल्या उसापोटी सभासदांना एकूण ३४०० रुपये प्रतिटन इतका अंतिम दर निश्चित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. यापूर्वीच कारखान्याने ३१७३ रुपये प्रतिटन एफआरपी अदा केली आहे. तर, वार्षिक सभेत प्रतिटन २१ रुपये प्रतिटनाप्रमाणे भागविकास निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतिटन २०६ रुपये इतके अंतिम बिल मिळणार आहे.
सोमेश्वर कारखान्याने सन २०२४-२५ या हंगामात १२.०६ टक्के उताऱ्याने १२ लाख ५६ हजार टन उसाचे गाळप केले होते. हंगामाच्या सुरवातीला २८०० रुपये प्रतिटन इतकी पहिली उचल दिली होती. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिटन ३१७३ रुपये इतकी एफआरपी निश्चित केली आणि उर्वरित ३७३ रुपये प्रतिटन रक्कम मार्चअखेरीस अदा केली होती. आता ताळेबंद तयार झाल्यानंतर संचालक मंडळाची अंतिम दराबाबत दोन वेळा बैठक पार पडली. आजच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले.
संचालक मंडळाने सर्व शेतकऱ्यांसाठी प्रतिटन ३२०० रुपये इतका एकूण पायाभूत अंतिम दर निश्चित केला. यामध्ये कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगरसभासद यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून खोडकी बिलापोटी प्रतिटन २०० रुपये अधिकचे देण्याचा निर्णय घेत एकूण अंतिम दर ३४०० रुपये प्रतिटनांपर्यंत नेला. कार्यक्षेत्राबाहेरील बिगरसभासद वा गेटकेनधारक यांना मात्र ३२०० रुपये प्रतिटन हाच दर अंतिम करण्यात आला.
हंगामात साखर तारण कर्जावरील व्याजात मोठी वाढ झाली, बगॅसला 66 प्रतिटन एक हजार रुपये इतका कमी दर मिळाला. यामुळे गत हंगामापेक्षा प्रतिटन १७० रुपयांचा फटका बसला. तसेच, गंत हंगामाच्या तुलनेत गाळप आणि उताऱ्यातही घट झाली. शिवाय गत हंगामात साखर निर्यातीमुळे अधिकचे पैसे मिळाले होते. या कारणांनी गत हंगामापेक्षा दर कमी आहे. मात्र, प्रतिटन ३४०० रुपये हा दरही जिल्ह्यात आणि राज्यात सर्वोच्च आहे. सांगली, कोल्हापूरपेक्षा साखर उतारा कमी असतानाही हा दर दिला आहे, असे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी मिळणार अंतिम बिले
वार्षिक सभेत भागविकास निधीअंतर्गत शिक्षणनिधी प्रतिटन २० रुपये, तर सोमेश्वर मंदिर निधी प्रतिटन १ रुपये कपातीचा प्रस्ताव मांडला आहे. ठरावाच्या मान्यतेनंतर कार्यक्षेत्रातील सभासद व बिगरसभासद यांना दिवाळीपूर्वी २०६ रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम बिले अदा केली जाणार आहेत. दरम्यान, कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारकांना प्रतिटन २७रुपयाप्रमाणे अंतिम बिल दिवाळीपूर्वी अदा केले जाणार आहे.