सातारा : ढवळ (ता. फलटण) येथे प्रगतिशील शेतकरी श्रीरंग लोखंडे यांच्या शेतावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ऊस उत्पादकता वाढ मोहिमेंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी खालिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या सुपरकेन नर्सरी तंत्रातील ऊस रोपवाटिका प्रात्यक्षिक पाहणी मंडल कृषी अधिारी अजित जगताप यांनी केली. उपकृषी अधिकारी दत्तात्रय राऊत, राजेंद्र पालवे, शेतकरी दत्तात्रय लोखंडे, मिलिंद गडदे, राजकुमार लोखंडे, दीपक मोहिते आदी शेतकरी उपस्थित होते. ऊस उत्पादनाचा एकरी १०० मेट्रिक टनांचा टप्पा गाठण्यासाठी सुपरकेन नर्सरी तंत्र फायदेशीर ठरेल. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले.
सुपरकेन नर्सरी तंत्राने शेतकरी नीलेश गार्डी, सुनील गार्डी, अरविंद राक्षे, सुनील सरक यांनी अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून रोपवाटिका उभारल्या आहेत. या सुपरकेन रोपवाटिकेला परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी यांनी भेटी दिल्या आहेत. हे तंत्र अतिशय सोपे, अल्प खर्चिक आणि फायदेशीर असून, या तंत्राचा वापर आम्ही निश्चित करू, असे ऊस उत्पादक शेतकरी यांनी पाहणीदरम्यान आवर्जून सांगितले. यावेळी जगताप म्हणाले की, “सुपरकेन नर्सरी तंत्राचा अवलंब केल्यास कमीत कमी खर्चात, कमी कालावधीत निरोगी, सशक्त व जोमदार ऊस रोपे तयार करता येतात, तसेच जलद उगवण होऊन केवळ २२ व्या दिवसापासून रोपे लागवडीसाठी वापरता येतात. उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याने ऊस उत्पादकांनी ऊस रोपे निर्मितीसाठी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा व खर्च कमी करून अधिकाधिक ऊस उत्पादन घ्यावे.