कोल्हापूर : गेल्यावर्षी राज्यात 15 नोव्हेंबर 2024 ला हंगाम सुरू झाला होता. राज्यातील अनेक साखर कारखानदार निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने ऊस गाळपास नोव्हेंबरच्या उत्तरार्धात वेग आला. कर्नाटकमधील कारखान्यांनी मात्र 25 ऑक्टोबर 2024 ला गाळप सुरू केले. त्यामुळे कर्नाटकच्या अनेक कारखान्यांनी सीमाभागातील महाराष्ट्राच्या हद्दीतला ऊस गाळप केला. याचा फटका कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील कारखान्यांना बसला.
गेल्या वर्षी उसाचा हंगाम उशिराने सुरू झाल्याने कर्नाटकातील साखर कारखान्यांनी राज्यातील कारखान्यांचा सुमारे तीस लाख टन ऊस पळवून नेला. कमी गाळप आणि कमी उताऱ्यामुळे साखर उद्योगाला १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा आर्थिक फटका बसला. यंदा तशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी कर्नाटकबरोबर हंगाम सुरू करण्याबाबत कारखान्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कारखानदारांच्या संघटनांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
गेल्यावर्षीचा साखर हंगाम मंदीचा ठरला. हंगामात २०० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. परंतु उसाची कमी उपलब्धता आणि कमी उतारा यामुळे अनेक कारखान्यांनी लवकर गाळप बंद केले. महाराष्ट्रातील साखर उत्पादन २०२३ २४ च्या हंगामाच्या तुलनेत सुमारे २६.६ टक्क्यांनी कमी झाले. या हंगामात ११० लाख टन उत्पादन झाले होते, २०२४- २५ मध्ये ते ८०.७६ लाख टनांपर्यंत घसरले. त्यामुळे सीमाभागातील कारखान्यांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक बरोबरच राज्यातील हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्तालयांचील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत.