सोलापूर : माळीनगर येथील शुगरकेन प्रोड्यूसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ६९ वी वार्षिक सभा नुकतीच झाली. संस्थेचे अध्यक्ष अमोल ताम्हाणे यांनी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. तसेच सभासद धारण क्षेत्र मर्यादित ठेवीवर दहा टक्के व्याज देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी प्रतिवर्षीप्रमाणे संस्थेच्या वतीने अहवाल सालात उसाचे एकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभेला संस्थेचे उपाध्यक्ष कपिल भोंगळे, संचालक नामदेव आगम, सुरेश राऊत, सुरेंद्र बधे, मनीष रासकर, विशाल गिरमे, जयवंत चौरे, कुणाल इनामके, अलका बोरावके, विद्या गिरमे, मनोहर जाधव, मॅनेजर अनिल गिरमे, सरकारी ऑडिटर दिनेश शहा आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अमोल ताम्हाणे म्हणाले की, संस्थेचे ९३ लाख ८१ हजार ३२० रुपये भागभांडवल आहे. पाच कोटी ५८ लाख ६९ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने यावर्षी १८ लाख ८७ हजार ९७५ रुपये निव्वळ नफा मिळवला असून त्यातून सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सभासद धारण क्षेत्र ठेवींवर १० टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आडसाली उसातील भरघोस उत्पादनाबद्दल कुणाल इनामके, दत्तात्रय पांढरे, पूनम इनामके तर खोडवा ऊस पिकामधील उत्पादनाबद्दल दिलीप इनामके, परेश बोरावके यांचा सत्कार करण्यात आला. सभासद किरण गिरमे, परेश नवले, विजय निवसे, आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे मॅनेजर अनिल गिरमे यांनी उत्तरे दिली. त्यानंतर सर्व विषय मंजूर करण्यात आले.