सातारा : राज्यातील गळीत हंगामाला यंदाचा ‘दिवाळी’चा मुहूर्त लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकांमुळे हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता. यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही नुकसान झाले होते. यंदा दिवाळीच्याच तोंडावर जरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्या, तरी त्याचा फारसा परिणाम हंगामावर होणार नसल्याची चिन्हे आहेत. १५ दिवस अगोदरच हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हंगाम निश्चितीसाठी दि. २५ सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने समाधानाचे शेतकऱ्यांमध्ये वातावरण आहे. त्यातच शेतकऱ्यांना यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरवर्षी राज्याच्या मंत्री उपसमितीची बैठकीत हंगामाची तारीख निश्चित करण्यात येते, सध्याच्या घडीला मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबईत पेटल्याने अद्याप हंगामाचे नियोजन करणाऱ्या समितीची बैठक झालेली नाही. हे वातावरण आणखी काही दिवस राहणार असल्यानेच महिनाअखेरीलाच मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुका ऐन दिवाळीत आल्याने हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता. हंगाम लांबल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळल्याच्या तक्रारी आहेत, तर कारखानदारांनाही उस नेताना कसरत करावी लागली होती, याचा फटका शेतकऱ्यांना जास्त बसला.