होशियारपूर : मुसळधार पावसामुळे गढशंकर परिसरातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. गढशंकरमध्ये नद्या ओसंडून वाहत असल्याने, १७ गावांची शेते आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे पीटीआयमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. बियास नदीकाठी, दीर्घकाळ पाणी साचल्याने भात, उसासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले,असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गांधोवाल, रारा मांड, तळी, सलेमपूर, अब्दुल्लापूर, मेवा मियानी आणि फट्टा कुल्ला, तसेच मुकेरियनमधील मोताळा, हलेर जनार्दन, सानियाल, कोलियन, नौशेरा आणि मेहताबपूर या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ५,२८७ हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे. गडशंकरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) संजीव कुमार म्हणाले की, परिसरातील नाले ओसंडून वाहत असल्याने पुराचे पाणी हकुमतपूर, बद्दोन, अलावलपूर, भाना, ठक्करवाल आणि खानपूर गावांमध्ये शिरले. वाहणाऱ्या नाल्यांमुळे शेतात आणि रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे सुमारे १७ गावे प्रभावित झाली आहेत. हकुमतपूर आणि बद्दोनसह काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले आहे, असे त्यांनी सांगितले.