कोल्हापूर : यंदा साखरेला वर्षभर सरासरी प्रतिक्विंटल ३८०० ते ३९०० रुपये दर मिळाला. साखरेचा चांगला दर तसेच वारणा सहकारी साखर कारखान्याने उपपदार्थांतील उत्पन्नातील नफा लक्षात घेऊन ५०० रुपये प्रती टन दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यासह शिष्टमंडळाने कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात सदाशिव कुलकर्णी, उत्तम पाटील, नानासाहेब इंगळे, धनपाल पाटील, शिवाजी आंबेकर, सागर माळी, शिवाजी माने, अशोक चव्हाण, पांडुरंग इंगळे, भैरवनाथ मगदूम, बाळासाहेब पाटील, विजय माने, सुभाष सुतार, दत्ता कोरे, शिवाजी चव्हाण, धनपाल पाटील आदींचा समावेश होता.
अध्यक्ष शिवाजी माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, यंदा रासायनिक खतांचे दर, तणनाशक, रोग किडीवर लागणाऱ्या निविष्टा, मशागत, मजुरी खर्च वाढला आहे. एफआरपीतील वाढ तोडणी वाहतूक खर्चात वाढवून दिली जाते. प्रत्यक्षात ४ ते ५ टक्केच एफआरपीत वाढ मिळाली. तोडणी वाहतूक खर्च ३० टक्के वाढला आहे. नियमित एफआरपी अधिक साखरेसह इतर उपपदार्थामधून नफ्यातून वरील रक्कम सरकारने द्यावी, अशी मागणी सभेत मंजूर करावी. यावेळी कारखान्याचे संचालक शहाजी पाटील, रवींद्र जाधव उपस्थित होते.