कोल्हापूर : कर्नाटकातील कारखान्यांना आपली गाळप क्षमता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील ऊसावर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. गेल्या ११ वर्षांत, २०१३-१४ पासून कर्नाटकात उसाच्या उत्पादनापेक्षा गाळपाचे प्रमाण घटले आहे. प्रत्यक्ष ऊस उत्पादन व गाळप यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सोलापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात नेला जातो. विनासायास ऊस जातो, झोनबंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल ऊस लवकर घालवण्याकडे होतो. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेवर असलेल्या कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवतो. यातून महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडत आहेत.
कर्नाटकातील बहुतांशी साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. राज्यातील एकूण उसाचे उत्पादन पाहता राज्यातील हंगाम ८० ते ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालूच शकत नाही. या राज्यातील अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील प्रत्यक्ष ऊस उत्पादनापेक्षा स्थानिक साखर कारखान्यांकडून होणारे ऊस गाळप सातत्याने जास्त होत आहे. विशेषतः २०२३ – २४ च्या हंगामात कर्नाटकात उसाचे उत्पादन ४१८.०५ लाख टन होते; प्रत्यक्षात त्यावर्षीचे गाळप ५८५.०८ लाख टन झाले. या एका हंगामातच कर्नाटकमध्ये तब्बल १६७.०३ लाख टन अतिरिक्त गाळप झाले आहे. हा वाढलेला ऊस महाराष्ट्राच्या सीमाभागातील कारखान्यांच्या हद्दीतूनच आला आहे. कर्नाटकमध्ये गळीत हंगाम महाराष्ट्राच्या तुलनेत एक-दोन आठवडे अगोदरच सुरू होतो. महाराष्ट्रात दिवाळीनंतर तर कर्नाटकात दसऱ्यापासूनच कारखाने सुरू केले जातात. ऊस तोडणीनंतर पैसेही तातडीने दिले जातात. मात्र, कमी उसामुळे उत्पादन खर्च वाढून महाराष्ट्रातील कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. याबाबत साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील किमान कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील हंगाम कर्नाटकप्रमाणे सुरू करण्याची परवानगी मिळण्याची गरज आहे.