अहिल्यानगर : अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव उधळून लावण्याचे माजी आमदार मुरकुटे यांचे आवाहन

अहिल्यानगर : अशोक कारखान्याबद्दल चुकीची माहिती सभासद शेतकऱ्यांमध्ये पोहचवली जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाना ज्यावेळी आमच्या ताब्यात आला, त्यावेळी या कार्यक्षेत्रात फक्त पस्तीस हजार टन उस होता. अशा परिस्थितीत काहीजणांनी कारखाना बंद करण्याचा सल्लाही त्यावेळी दिला. मात्र, यावर मात करत कारखाना चालविला. आता राहुरीचा कारखाना जसा बंद पाडला तसा अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे. तो हाणून पाडा, असे आवाहन अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी मुरकुटे बोलत होते.

बंधारा पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके होते. माजी संचालक एकनाथ लेलकर, कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, संचालक नीरज मुरकुटे, बाजार समिती संचालक मयूर पटारे, दत्तात्रय नाईक, पुंजाहरी शिंदे, गणेश छल्लारे आदी प्रमुख उपस्थित होते. मुरकुटे म्हणाले की, अशोक कारखाना ही कामधेनू आहे. ती जपण्यासाठी आम्ही जुन्या पिढीतील लोकांनी संघर्ष केला. हीच आपली कामधेनू टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ‘अशोक’लाच उस द्यावा. आपला कारखाना कमी ऊस दर देतो असा केला जाणारा आरोप चुकीचा आहे. शेजारील मुळा, ज्ञानेश्वर यांचे गाळप आपल्यापेक्षा जास्त असूनही त्यांचा भाव आपल्या बरोबरीने म्हणजेच २७०० रुपये आहे. काही कारखान्यांना दारू निर्मितीची जोड असल्याने ते जास्त भाव देतात. आपल्या कारखान्याचे गाळप साडेचार लाख टन झाले आहे. गाळप कमी झाल्यास कारखाना चालणार नाही. आपण ऊसावर आधारीत अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. यावेळी माजी उपसरपंच पाराजी पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पटारे, लक्ष्मण सटाले, भागवत रणनवरे, संजय रणनवरे, शिवाजी पटारे, दत्तात्रय पटारे, रावसाहेब वाघुले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here