विक्रमी ऊस उत्पादकांनी मार्गदर्शन करावे : साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ

सांगली : ‘क्रांती’च्या ऊस विकास विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे. वेगवेगळे शेतीपयोगी उपक्रम राबवून एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे मत साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखानाच्यावतीने कार्यक्षेत्रातील विक्रमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सालीमठ यांच्याहस्ते पुरस्कार वितरण त्याचप्रमाणे कारखान्याच्या सभासदांना सभासद प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सालीमठ म्हणाले, क्रांती कारखान्याकडून विशेष चर्चासत्राचे आयोजन करून विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा निमंत्रित करावे. प्रगतिपथावर असलेल्या व शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या क्रांती कारखान्याच्या पाठीशी साखर आयुक्त या नात्याने उभा असेन. कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील बराचसा ऊस कर्नाटक राज्यात पाठवला जातो, ही बाब गंभीर असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे व त्यामध्ये यासंबंधी तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले, एकरी सरासरी २६ टन उसाचे उत्पादन आता ४६ टन झाले आहे. ऊस विकास विभागातून शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे व खत पुरवठा करण्यात येतो. अलीकडच्या काळात मनुष्यबळ कमी झाले असल्याने शेतीची विविध उपकरणे विकसित करण्याकडे आमचा भर राहिला आहे. आज एकरी १५० टनपेक्षा जास्त उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत, परंतु सरासरी ४६ टन पासून १५० टनच्या मधल्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे.

कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, पहिल्या हंगामावेळी लोकरी मावा व दुष्काळ अशा समस्या आल्याने सुरवातीच्या काळात आम्ही अत्यंत काटकसरीने व पारदर्शक पद्धतीने कारखान्याचा कारभार केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसविकास योजनेची सुरवात केली. त्यामध्ये पाणी, माती, देठ परीक्षण केंद्र उभारले. त्यानंतर हकाचा ऊस निर्माण करण्यासाठी पथदर्शी ऊसविकास कार्यक्रम आयोजित करावा लागेल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. यावेळी प्रादेशिक सहसंचालक संगीता डोंगरे, उपसहसंचालक गोपाळ मावळे, कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here