कॅलिफोर्निया (अमेरिका) : कॅलिफोर्नियाच्या संसदेने उच्च-इथेनॉल पेट्रोल मिश्रणाच्या विक्रीला परवानगी देण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अमेरिकेच्या सर्वात मोठ्या ऑटो मार्केटमध्ये इंधनाच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर 15 टक्के इथेनॉल असलेले मिश्रण E 15 ची विक्री त्वरित करण्यास परवानगी दिली जाईल. कॅलिफोर्निया हे एकमेव अमेरिकन राज्य होते, ज्यांनी या इंधनाच्या विक्रीला आतापर्यंत परवानगी दिली नव्हती.
या निर्णयामुळे जैवइंधन उत्पादक आणि मका उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात त्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ वाढेल. कॅलिफोर्नियाच्या राज्य सिनेटने एबी 30 हे विधेयक 39 -0 मतांनी, एकमताने मंजूर केले. हे विधेयक जूनमध्ये राज्य विधानसभेत मंजूर झाले होते. गेल्यावर्षी न्यूसमने कॅलिफोर्नियाच्या नियामकांना राज्य पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवू शकते का, याचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते, परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कॅलिफोर्निया आपली महत्त्वाकांक्षी पर्यावरणीय उद्दिष्टे राखत गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल पंपांच्या किमतींवर कसा अंकुश लावायचा याचा विचार करत आहे.
कॅलिफोर्नियाच्या सिनेटर लॉरा रिचर्डसन यांनी सिनेटमध्ये हे विधेयक सादर करताना सांगितले की, कॅलिफोर्नियाचे ग्राहक आता जास्त काळ वाट पाहू शकत नाहीत. या इंधनाच्या उपलब्धतेमुळे राज्यात पेट्रोलच्या किमती प्रति गॅलन २० सेंटने कमी होऊ शकतात या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका अभ्यासाचा त्यांनी हवाला दिला.
याबाबत, रिन्यूएबल फ्युएल्स असोसिएशनचे अध्यक्ष जेफ कूपर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आज एबी३० मंजूर झाल्यामुळे, कॅलिफोर्निया पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी आणि राज्यातील कुटुंबांसाठी स्वच्छ, अधिक शाश्वत भविष्यासाठी एक मोठे पाऊल उचलले जात आहे. इतर अनेक राज्यांनी ई १५ चे फायदे (निरोगी हवा, चांगले इंजिन कार्यप्रदर्शन आणि खर्च बचत) आधीच पाहिले आहेत. आता, कॅलिफोर्नियातील ड्रायव्हर तेच फायदे अनुभवण्याच्या मार्गावर आहेत आणि आम्ही गव्हर्नर न्यूसम यांना लवकरात लवकर या विधेयकावर स्वाक्षरी करून कायद्यात रूपांतरित करण्याची विनंती करतो.”