पुणे : पाडेगाव केंद्राने उती संवर्धित ऊस रोप निर्मितीकडे वळावे – महासंचालक वर्षा लड्डा यांचा सल्ला

पुणे : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने काळानुरुप शेतकऱ्यांसाठी उती संवर्धित रोपांच्या निर्मितीवरही केंद्राने भर देऊन याबाबत मोहीम राबवावी, अशी सूचना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक वर्षा लड्डा- उंटवाल यांनी केली. महासंचालकांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फलटण येथील पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास त्यांनी भेट देऊन तेथील अडचणी समजून घेतल्या. या वेळी पाडेगांव केंद्राच्या योगदानावर बैठकीत सादरीकरणही करण्यात आले. त्यानंतर ऊस व सोयाबीन प्रक्षेत्रालाही त्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. ऊती संवर्धित रोप निर्मितीसाठी केंद्राने आवश्यक तो प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

लड्डा – उंटवाल यांनी राज्यात पाडेगाव केंद्राकडून संशोधित ‘को-८६०३२’ या ऊस वाणाखाली सुमारे ४९ टक्के आणि ‘को-ए २६५’ ऊस वाणाखाली २५ टक्क्यांइतके भरीव क्षेत्र आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या दोन ऊस वाणांचे बेणे शेतकऱ्यांना देण्यात येते. ही चांगली बाब आहे याबाबत केंद्राचे कौतुक केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ व व्यवस्थापक डॉ. राजेंद्र भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले. कृषी परिषदेचे संशोधन संचालक किशोर शिंदे यांच्यासह पाडेगांवच्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे उपस्थित होते. पाडेगाव केंद्राला मंजूर झालेल्या ४० कोटींच्या निधीतील कामांबाबतची निविदा राबवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही लड्डा- उंटवाल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here