सातारा : फलटण तालुक्यात दरवर्षी सरासरी २० हजार हेक्टरवर उसाची लागवड होते. मुख्य नगदी पीक म्हणून शेतकरी त्याकडे पाहतो. सोबत चारा आणि विक्रीच्या मका पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. अशा स्थितीत तालुक्यात मे महिन्यानंतर दमदार पाऊस झाला नसल्याने ऊस आणि मका पिकात हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणीचा प्राथमिक स्तरावर असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाय करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सद्यस्थितीत दमदार पावसाअभावी हुमणी किडीच्या वाढीस पोषक वातावरण मिळाले. त्यामुळे हुमणी अळीने डोके वर काढले. ऊस आणि मका पिकावर हुमणीचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते.
शेतकरी तसेच कृषी विभागाने आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यादरम्यान उसासह शेतातील अन्य पिकांचे नुकसान झाले. मात्र, नंतर तब्बल महिनाभर शेतीच्या कामास वाफसा नव्हता. त्यानंतर तीन महिने मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. परिणामी किडींचा फैलाव झाल्याचे दिसते. याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव म्हणाले की, ईपीएन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्याने प्रतिएकर एक लिटर २०० मिलिलिटर पाण्यात ईपीएन जैविक कीड नियंत्रक मिसळून जमीन वाफशावर असताना बेटाजवळ आळवणी पद्धतीने वापर करावा. त्यानंतर जमिनीत वाफसास्थिती ठेवल्यास चांगला परिणाम दिसून येतो.