सोलापूर :राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याचे प्रादेशिक साखर कार्यालय पूर्णवेळ अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. वर्ग एकचे लेखापरीक्षक अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याचा कारभार हाकत आहेत. तर दोन पदांवर वर्ग दोनचे प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. वार्षिक सुमारे चार हजार कोटींहून जास्त प्रत्यक्ष उलाढाल तर त्यापेक्षा दुप्पट अप्रत्यक्ष उलाढाल असणारा साखर उद्योग जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. मात्र या विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे.
निवृत्त सहसंचालक सुनील शिरापूरकर यांचा तीन महिन्याचा कालावधी वगळता दोन वर्षांपासून सहसंचालक पदाचा भार प्रभारीवरच आहे. तत्कालीन सहसंचालक पांडुरंग साठे यांची धाराशिव येथे बदली झाल्यानंतर सोलापूरला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. साठे यांच्यानंतर पुणे येथील आयुक्त कार्यालयातील दीपक अष्टेकर यांच्याकडे पदभार होता. तीन महिन्यापूर्वी या पदावर धाराशिवचे उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या महिन्यात ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे पदभार पुन्हा अष्टेकर यांना देण्यात आला आहे. लेखापरीक्षकांच्या जागाही रिक्त आहेत. एक पदभार सोलापूर कार्यालयातून अहिल्यानगर येथे बदलून गेलेल्या जी. व्ही. निकाळजे यांच्याकडेच आहे. इतर दोन पदांवर प्रभारी नेमणुका आहेत. राज्य सरकारने लेखापरीक्षक भरती पूर्णपणे थांबवली असल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जाते.