कोल्हापूर : ‘दौलत’ साखर कारखाना चालविण्यासाठी दिलेल्या अथर्व कंपनीने कर्जाची रक्कम न दिल्यास ही रक्कम जिल्हा बँक भरेल. कारखाना सभासदांचाच राहील, असे उत्तर बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. दौलत साखर कारखाना, कर्जमाफी, सेवा संस्थांच्या मार्जिनमध्ये वाढ करावी, विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी निधी उभा करावा, अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भात सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
गोपाळराव पाटील व सुभाष देसाई यांनी दौलत साखर कारखान्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना मुश्रीफ यांनी कंपनीला पैसे भरण्यास सांगितले आहे, अन्यथा बँक जबाबदारी घेईल. तसेच, सन २०१०-११ मधील एफआरपी फरकाची रक्कम व्याजासह देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रा. जालिंदर पाटील यांनी शैक्षणिक कर्जाचे व्याज, तर ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी साखर कारखान्यावरील कर्जाचे व्याज २ टक्क्यांनी कमी करावे, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत बी. के. डोंगळे, बी. आर. पाटील, स्वस्तिक पाटील, वसंतराव देसाई, विलास पाटील आदींनी भाग घेतला.