सातारा : साखर उद्योगातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाहतूक व तोडणी हा घटक महत्त्वाचा आहे. गेल्या पाच वर्षांत उस शेती व साखर उद्योगामध्ये बरेच बदल झाले आहेत. इंधनाचे दर वाढले की सर्वच गोष्टी महागतात. त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने ऊस वाहतुकीचे दरही भरमसाठ वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन ५५० रुपयांची वाढ झाली. तर वाहतूक तोडणीतही सरासरी २६९ रुपये वाढले आहेत. याच कालावधीत इंधनाचे दर हे सरासरी २२ रूपयांनी वाढले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे तशीच वाढ साखर कारखानदारांनी वाहतूक व तोडणीतही केली आहे असेच दिसून येते.
साधारणतः पाच वर्षापूर्वी वाहतूक तोडणीचा खर्च हा ६७० रुपये प्रती टन होता तो आता ९३९ रुपयांवर गेला आहे. उसाची वाहतुकीचे दर कारखानदार निश्चित करतात तर तोडणीचे दर हे त्या-त्या टोळ्यांकडील मुकादम ठरवत असतात. तसा वाहतूकदार व मुकादमात करार केला जातो. पाच वर्षांचा विचार केला तर वाहतूक तोडणीत ३५ ते ४० टक्के वाढ झाली होती. २०२०-२१ च्या हंगामात सातारा जिल्ह्यात वाहतूक तोडणी सरासरी ६७० रुपये होती. गेल्यावर्षी वाहतूक तोडणी ९३९ रुपये झाली. म्हणजेच २३९ रूपयांची वाढ झाली. यात पुढील हंगामात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक तोडणीतील वाढ, इंधन दर, कर्जाचे व्याज या गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही.