चंदीगड / जयपूर : देशाच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंजाब आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इतर राज्यांमध्येही पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु ते काही क्षेत्रांपुरते मर्यादित आहे. याबाबत रेटिंग एजन्सी क्रिसिलने पुढील काही आठवडे कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरतील, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, पावसामुळे पंजाबमध्ये पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्य चार दशकांतील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. येथील ४२.४ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनीपैकी ७०,००० हेक्टर पुरामुळे प्रभावित झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भात, ऊस आणि कापूस पिके पाण्याखाली गेली आहेत.
अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबरमधील पावसाचा पॅटर्न महत्त्वाचा ठरेल. हवामान खात्याने या महिन्यात उत्तर आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भात, कापूस, सोयाबीन, मका आणि कांदा यासारख्या पिकांसाठी वाढीचा हा काळ आहे. यंदा २ सप्टेंबरपर्यंत, दीर्घकालीन सरासरीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये, पंजाबमध्ये दीर्घकालीन सरासरीपेक्षा ७४ टक्के जास्त, हरियाणामध्ये ३३ टक्के, राजस्थानमध्ये १८ टक्के, आंध्र प्रदेशात ४६ टक्के, कर्नाटकात २९ टक्के, तेलंगणामध्ये ६२ टक्के आणि उत्तर प्रदेशात दोन टक्के जास्त पाऊस पडला. भात पिकात पाने उगवण्याच्या अवस्थेत पाणी साचल्याने पाने पिवळी पडू शकतात, पिकाची वाढ थांबू शकते आणि उत्पादनात ५ ते १० टक्के घट होऊ शकते. ऊस पिक पाण्याखाली गेल्याने रेड रॉट रोगाचा धोका वाढला आहे. त्यामुळे उसासोबतच साखरेच्या उत्पादनात ५ ते १० टक्के घट होण्याची शक्यता आहे. उसाच्या रसाच्या गुणवत्तेवरही परिणाम होईल. कापूस पिक सध्या फुलांच्या प्रक्रियेत आहे. शेतात पाणी साचल्याने कापसाचे उत्पादन १५ ते २० टक्के कमी होऊ शकते आणि गुणवत्तेवरही परिणाम होईल.