पुणे : इंदापूर तालुक्यात समाधानकारक पावसामुळे सध्या ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. एफआरपी आणि खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्याने उसाकडे शेतकऱ्यांचा ओढा कायम आहे. शेतकरी ऊस लागवडीत गुंतले आहेत. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीसाठी पोषक वातावरण आहे. उसावर इतर पिकांच्या तुलनेत हवामान बदलाचा फारसा परिणाम होत नाही आणि दरामध्येही चढ-उतार कमी असतात. याचाही परिणाम तालुक्यातील ऊस लागवडीवर दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यातील चार साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी स्वीकारतात. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विक्रीची चिंता नसते. त्यामुळे ऊस हे शेतकऱ्यांसाठी स्थिर आणि फायदेशीर पीक ठरले आहे. तालुक्यात ऊस लागवडीची कामे जोरात सुरू आहेत. ऊस तोडणे, बेण्याची वाहतूक, सरी सोडणे, बेणे दाबणे यासारखी कामे रस्त्यावरून ये-जा करताना सर्वत्र दिसून येत आहेत. सध्या एक एकर ऊस लागवडीसाठी सुमारे ७,५०० ते ८,००० रुपये मजुरी खर्च येत आहे, तर एका गुंठ्यासाठी ऊस बेण्याचा दर ६,००० रुपये आहे. सध्या शेतकरी को. ८६०३२ आणि फुले २६५ या उसाच्या वाणांना लागवडीसाठी प्राधान्य देत आहेत. या वाणांची उत्पादकता आणि रोगप्रतिकारक क्षमता यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे.