ईएसवाय २०२४-२५ : नोव्हेंबर २४ ते ऑगस्ट २५ दरम्यान सुमारे ८२० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

नवी दिल्ली : भारत आपल्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमात लक्षणीय प्रगती करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू इथेनॉल पुरवठा वर्ष (इएसवाय) २०२४-२५ मध्ये, तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) नोव्हेंबर ते ऑगस्ट या कालावधीत ८२०.५२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला. इएसवाय २०२४-२५ मध्ये आतापर्यंत, धान्यांपासून इथेनॉलचा पुरवठा ५२६.०१ कोटी लिटर झाला आहे. तर साखर-आधारित कच्च्या मालापासून पुरवठा २९४.५१ कोटी लिटर आहे.

भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण यशस्वीरित्या साध्य केले आहे, अशी घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी अलीकडेच केली. हे लक्ष्य नियोजित लक्ष्यापेक्षा पाच वर्षे आधीच साध्य झाले आहे. या उल्लेखनीय वाढीमुळे देशाचे आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे परकीय चलनात लक्षणीय बचत झाली आहे.

सरकारने इथेनॉल उत्पादकांना दिलासा देत, साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२५-२६ दरम्यान कोणत्याही निर्बंधांशिवाय उसाचा रस, साखरेचा पाक, बी-हेवी मोलॅसिस (बीएचएम) आणि सी-हेवी मोलॅसिस (सीएचएम) पासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या समन्वयाने, डीएफपीडी वर्षभर घरगुती वापरासाठी साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देशातील साखर उत्पादनाचा तसेच इथेनॉल उत्पादनात साखरेच्या वापराचा वेळोवेळी आढावा घेईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here