नवी दिल्ली : E20 इंधनावर सोशल मीडियावर टीका होत आहे. ही टीका म्हणजे श्रीमंत आणि मजबूत पेट्रोल लॉबीने प्रायोजित केलेला अपप्रचार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी म्हटले आहे. E20 इंधन वाहनांच्या मायलेज आणि इंजिन कार्यक्षमतेबाबत गेल्या जाही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद-विवाद सुरु आहेत. याबाबत मंत्री गडकरी यांनी सडेतोड मत मांडले.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने येथे आयोजित केलेल्या वार्षिक ऑटो रिटेल कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना गडकरी म्हणाले, सर्वत्र लॉबी सक्रीय आहेत. हितसंबंध आहेत. तुम्ही (FADA) देखील त्या लॉबींपैकी एक आहात. आम्हाला तुमच्याकडून पाठिंबा अपेक्षित आहे. सोशल मीडियावर काही प्रचार चालू आहे, तो काही लोकांकडून प्रायोजित आहे. पेट्रोल लॉबी खूप श्रीमंत आणि मजबूत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने १२ ऑगस्ट रोजी म्हटले होते की, इंधन कार्यक्षमतेत घट झाल्याची चर्चा निराधार आहेत आणि E0 इंधनाकडे परत जाण्याचा पर्याय म्हणजे प्रदूषण आणि ऊर्जा संक्रमणावरील कष्टाने मिळवलेले नफा गमावणे असेल.
गडकरी यांनी बुधवारी भारतीय ऑटोमोबाईल उद्योगातील रेअर अर्थ मॅग्नेट्स आणि काही वर्षांपूर्वीच्या सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेबद्दलही भाष्य केले. दोन्ही टंचाई प्रामुख्याने भारताच्या या सामग्रीसाठी चीनवर अवलंबून राहिल्यामुळे उद्भवली. पूर्वी, भारतात सेमीकंडक्टर चिप्सच्या उत्पादनाशी संबंधित परिस्थिती चांगली नव्हती. आज, आम्ही भारतात सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे, आमचे स्टार्टअप्स आता बॅटरी केमिस्ट्रीजवर काम करत आहेत, उदा. सोडियम आयन बॅटरी, लिथियम आयन बॅटरी, झिंक आयन बॅटरी, अॅल्युमिनियम आयन बॅटरी इत्यादी. हे स्टार्टअप्स चांगले संशोधन करत आहेत, असे ते म्हणाले.
मंत्री गडकरी यांनी नमुद केले की, जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग केल्याने मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ मॅग्नेट्स निर्माण होऊ शकतात आणि सरकार अशा उपक्रमांना पुरेसे प्रोत्साहन देत आहे. पर्यायी इंधन आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीवर सरकारचा दबाव असताना पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या भविष्याबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, “लोक मला सांगत असतात की तुम्ही सर्व पर्यायी इंधन आणि जैवइंधनाला पाठिंबा देत राहा. लोकांच्या मनात एक गोंधळ आहे की आता सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, मग (पेट्रोल किंवा डिझेल वाहनांचे) काय होईल? तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पेट्रोल आणि डिझेल वाहनांची मागणी अजूनही वाढणार आहे, कारण ऑटोमोबाईल उत्पादन सुमारे १५-२० टक्क्यांनी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठदेखील खूप मोठी आहे.”
भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वाढीबद्दल गडकरी म्हणाले, “जेव्हा मी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाचा आकार १४ लाख कोटी रुपये होता. आणि आपण सातव्या क्रमांकावर होतो. जगातील नंबर वन ऑटोमोबाईल बाजारपेठ अमेरिका आहे. त्यांचा ऑटोमोबाईल उद्योग ७८ लाख कोटी रुपयांचा आहे. चीन ४७ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आता भारत २२ लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मला विश्वास आहे की पर्यायी इंधन, जैवइंधन, बॅटरी रसायने, नवीन तंत्रज्ञान आणि नवोपक्रम विकसित करून, भारताला जगात नंबर वन बनवण्याचे आमचे ध्येय पूर्ण होईल. ते कठीण आहे, परंतु अशक्य नाही. कारण भारतात वाहनांच्या निर्मितीचा खर्च आणि येथे उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा दर्जा खूप चांगला आहे. गुणवत्ता चांगली आहे आणि खर्च कमी आहे.भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या भविष्याबद्दल गडकरी म्हणाले, सर्व मोठे उत्पादक भारतात उत्पादन करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की देशांतर्गत क्षमता खूप जास्त आहे आणि आंतरराष्ट्रीय क्षमता त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे या उद्योगाचे भविष्य खूप चांगले आहे.