अहिल्यानगर : मोठे कार्यक्रम झाले, घोषणा दिल्या, मिरवणुका निघाल्या. मात्र पाच ते सहा महिन्यात भोजापूर पूर चारीला पाणी आपोआप येते का? आमच्या सत्तेत असताना चारीचे काम आम्ही केले. सुदैवाने यावर्षी मे महिन्यात पाऊस भरपूर पडल्याने पाणी आले आणि खालीही गेले. काम सगळे आम्ही केले, पण तुम्ही खोट्या-नाट्या गोष्टींचे श्रेय घेता. आयत्या पीठावर रेघोट्या ओढता, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात टीका केली. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, पांडुरंग घुले, बाजीराव खेमनर, माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहोळ, आर.बी. राहणे, शंकर खेमनर, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, डॉ. जयश्री थोरात, सुनंदा भागवत आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ३५ वर्ष खासदारकी तुमच्याकडे होती, पण तुम्ही एक खडा तरी उचलला का? विरोधक फक्त भाषणं करून, मिरवणुका काढून लोकांना भ्रमित करतात. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय तालुक्याची प्रगती होत नाही. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा प्रत्यक्ष कामे केली. आता तेच काम तुम्ही आपले म्हणून मिरवता हे लोकांना माहीत आहे. जे लोक प्रतिनिधी झाले त्यांनी लोकांची कामे करायला हवीत. पण तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालता ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. चाळीस वर्षांच्या मेहनतीने हा सहकार उभा केला आहे, त्याचा अभिमान प्रत्येकाने जपावा, असेही ते म्हणाले.