सातारा : देशपातळीवर साखर उद्योग क्षेत्रामध्ये तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या अग्रगण्य संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाने य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांना जीवन गौरव 2025′ हा मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे.
सहकार कारखानदारीत बाजीराव सुतार यांचे 39 वर्षाचे सलग योगदान आहे. प्रशासकीय कामकाज, आर्थिक शिस्त, तांत्रिक गुणवत्ता व पारदर्शक कारभार यावर त्यांचा साखर कारखानदारीतील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी त्यांनी विविध साखर कारखान्यांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांना सहकार भूषण २०१३, एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज इन इंडिया २०२५ चा दिल्ली येथे ‘चिनी मंडी’ यांच्या मार्फत अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. नुकतीच त्यांची भारतीय शुगर संस्थेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. बाजीराव सुतार यांनी आतापर्यंत सलग 39 वर्षे सहकारी साखर कारखानदारीत व्यवस्थापकीय व नाविन्यपूर्ण तांत्रिक बाबींची केलेल्या कार्याची दखल घेत डेक्कन शुगरने जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.
22 सप्टेंबर रोजी पुणे येथे जे डब्ल्यू मॅरीयट या पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर , राष्ट्रीय साखर संस्था कानपूर यांच्या संचालिका श्रीमती सीमा पारोहा, राज्याचे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी बाजीराव सुतार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी हा पुरस्कार सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले यांना समर्पित करतो, अशी भावना बाजीराव सुतार यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व्यक्त केल्या.