पुणे : यशवंत कारखान्याच्या ९९ एकर जमिनीची २९९ कोटींना विक्री, व्यवहारास मान्यता

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला थेऊर येथे उपबाजार आवाराकरिता यशवंत साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन २९९ कोटी रुपये किंमतीस विक्री करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत साखर आयुक्त व पणन संचालकांकडून प्राप्त प्रस्ताव दिला होता. कारखान्याच्या २६ फेब्रुवारी २०२५ व १७ मार्च २०२५ रोजीच्या सभेत जमीन विक्रीस मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सादर झाला होता. शिवाय जमीन खरेदी-विक्रीस यशवंत कारखाना व पुणे बाजार समिती यांच्यातील २८ मार्च २०२५ रोजी बाजार समिती मुख्यालयातील संयुक्त सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १२(१) नुसार मंजुरी प्रस्ताव पणन संचालकांनी शासनास २९ मे २०२५ रोजी सादर केला होता.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करावयाची असल्याचेही शासन निर्णयात नमूद केले आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र हवेली तालुक्यातील ९७ गावे, दौंडमधील १७ गावे, खेड तालुक्यातील १५ गावे आणि शिरूर तालुक्यातील २० गावे मिळून एकूण १४९ गावे आहेत. कारखान्याची सभासद संख्या २१ हजार १९६ आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता ३५०० मे.टन प्रतिदिन एवढी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी अॅक्ट २००२ अंतर्गत हा कारखाना ताब्यात घेतला आहे. सध्या साखर कारखाना बंद असून, हा कारखाना चालू करण्याचे प्रयत्न संचालक मंडळ व सभासदांनी चालवले आहेत. त्यासाठी कारखान्याकडील विविध बँकांची थकीत कर्जे, परतफेड करणे, शेतकरी व कामगार यांची देणी, शासकीय व इतर देणी भागविणे, भांडवली उभारणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here