कोल्हापूर : यंदाचा गाळप हंगाम पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता असून साखर उद्योगाकडून हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होऊ नये यासाठी यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा, असाही प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच साखर कारखानदारांची शेतकरी संघटनांकडून कोंडी केली जात आहे. साखर कारखान्यांना मिळालेल्या जादा उत्पन्नाकडे लक्ष वेधत शेतकरी संघटनांनी कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांपूर्वी शेतकऱ्यांना प्रति टन ५०० रुपये द्यावेत अशी मागणी लावून धरली आहे. गेल्या दोन-तीन हंगामामध्ये साखर उद्योगाला साखर या मुख्य उत्पादनासह इथेनॉल, मळी, सहवीज निर्मिती आदी उपपदार्थातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालेले आहे. या हंगामात हा मुद्दा राजकीय पातळीवर गाजण्याची शक्यता आहे.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी प्रति टन ५०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी उचलून धरली आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर कारखान्यांना निवेदने दिली जात आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर्षी चा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये द्यावेत अशी मागणी केलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सोलापूर विभागावर लक्ष केंद्रित केले आहेत. तर शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश या शेतकरी संघटनेने कारखान्यांवर दुचाकी यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. संघटनेने साखर व उप पदार्थ विकून कारखान्याला मिळालेल्या एकूण उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी आधी प्रति टन ५०० रुपये हप्ता द्यावा आणि मगच कारखाने सुरू करावेत, अशी भूमिका घेतली आहे. जय शिवराय शेतकरी संघटनेनेही अशीच मागणी करत कारखान्यांना निवेदने देण्यास सुरुवात केली आहे.