पुणे : जिल्ह्यातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे तालुक्यांत अनेक ठिकाणी रविवारी (ता. १४) दुपारपासून जोरदार पाऊस पडला. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, नायगाव, पेठ, टिळेकरवाडी, तरडे गावातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर मुसळधार पावसाने जिल्ह्यात काढणीला आलेल्या मूग, उडीद, सोयाबीन, तूर, बाजरी, भात अशा विविध पिकांचे नुकसान झाले. सोरतापवाडी परिसरातील गावांमध्ये फुलशेतीचे नुकसान झाले आहे. ऊस आणि भातशेतीत पाणी साठल्याने या पिकांचेही नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत नायगावचे माजी सरपंच गणेश चौधरी यांनी सांगितले की, नायगाव येथे तुफान पावसामुळे संपूर्ण पिकांचे शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गावात अनेक घरात पाणी शिरले आहे. शेतातील उसाच्या सऱ्या भरलेल्या असल्यामुळे लागवडीचा ऊस कुजण्याची शक्यता आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. पेठ गावचे शेतकरी दत्तात्रय चौधरी आणि सोरतापवाडीचे शेतकरी भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले की, सोरतापवाडीत तोडणीला आलेली फुले सुद्धा शेतातच काळी पडून कुजली आहेत. फ्लॉवर, कोबी, पालक, मेथी, शापू कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे.