लातूर : दहा हजार शेतकरी सभासद, २९८ गावे, सात तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला, बारा हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला जय जवान जय किसान साखर कारखाना जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कारखान्याकडे ३०० एकर जमीन आहे. कारखान्यात तीनशे कामगार होते. कारखाना बंद असल्यामुळे चाकूर, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कारखाना कर्जमुक्त करुन शेतकऱ्यांना तो सहकार तत्त्वावर चालवण्याची संधी द्यावी या मागणीसाठी कारखान्यासमोर बुधवारी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकरी सहदेव व्होनाळे यांनी कारखान्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
नळेगाव येथे १९८४ मध्ये माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या संकल्पनेतून उभारलेला कारखाना ३० वर्षे सुरळीतपणे चालला. पंधरा वर्षांपासून तो तांत्रिक कारणामुळे बंद पडला. कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे करोडो रुपयांचे कर्ज आहे. कर्ज थकल्याने बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक एस.व्ही. बदनाळे यांच्या पत्रानंतर अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माधव गंगापुरे, चंद्रशेखर कत्ते, ॲड. निशांत वाघमारे, घृष्णेश्वर मलशेटटे, राजू शेलार, एल.बी. आवाळे, माधव शिरुरे, मोहन जाधव, मनोज करवंदे, रमाकांत कोंडमगीरे, हणमंत सुरवसे, चंद्रकांत डोंगरे, गोविंद सावंत, राजकुमार शिंदाळकर, सूर्यकांत सुरवसे, नारायण राठोड, बालाजी कुंभार, शेषराव पाटील, वसंत कानगुडे यांनी पाठिंबा दिला.