सांगली : वाळवा तालुक्यातील एन. डी. पाटील शुगर या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम प्रारंभ २२ सप्टेंबरला होणार आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभासाठी सर्व यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील चांगला ऊसदर देण्याची परंपरा आम्ही जोपासण्यासाठी कटीबध्द आहोत. कारखान्याने साडे चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रतिदिन २५०० मेट्रिक टन गाळप होणार आहे. चालू वर्षी गाळपास येणाऱ्या उसाला एकरकमी प्रतिटन ३३०० रुपये दर देणार आहोत, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, संचालक केदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले की, आमची कोणत्याही साखर कारखान्याशी स्पर्धा नाही. आमची स्पर्धा स्वतःशीच असल्याने आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊस दर कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करू. सोमवारी सकाळी १० वाजता शकुंतला पाटील यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम होईल. गुळ पावडर आणि खांडसरी साखर निर्मिती होणार आहे. गाळपास आलेल्या उसास शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ दिवसांत एकरकमी ३३०० रुपये दर प्रती टन जमा करणार आहोत. कारखान्याने साडेसहा मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्पही सुरू केला आहे. डिस्टिलरी व अन्य उपपदार्थ निर्मितीसाठी लवकरच मशनरी उभारण्यात येईल. यावेळी संचालक मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, समीर तांबोळी उपस्थित होते.