सोलापूर : सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून झालेली अतिवृष्टी, सततच्या पावसाने साखर कारखानदार चिंतेत आहेत. जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे धुळे, नंदूरबार या भागातील ऊसतोडणी कामगार येण्यास सुरवात झाली आहे. मराठवाड्यातील कामगार दसऱ्यानंतर ऊस तोडणीसाठी येतील. यंदा दोन ऑक्टोबरला दसरा तर २३ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी कारखानदारांची मागणी आहे. पण अल् निनोमुळे पावसाळा लांबण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कारखानदार धास्तावले आहेत. यंदाच्या हंगामासाठी ३७ कारखान्यांनी तयारी केली असून सुमारे २ लाख हेक्टर ऊस उपलब्ध आहे.
दरम्यान, ऊस गाळपाचे धोरण ठरविण्यासाठी होणारी मंत्री समितीची बैठक २९ सप्टेंबरला होणार आहे. गाळप हंगामास १५ ऑक्टोबरपासून सुरवात करावी, अशी कारखानदारांची मागणी आहे. अनेक कारखानदारांनी तशी तयारी केली आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास काय असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. २९ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात बैठक होणार आहे. बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्याच्या तारीख निश्चितीसह उसाची उपलब्धता, गाळपाचे नियोजन, ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांची भूमिका यासह साखर उद्योगाशी निगडित विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. मात्र सतत पाऊस राहिल्यास ऊसतोडणी थांबून गाळपात खंड पडण्याची चिन्हे आहेत. युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सांगितले की, गतवर्षाच्या तुलनेत यंदा कारखाने अधिक काळ चालतील. चार महिने गाळप हंगाम चालू शकेल, इतका ऊस उपलब्ध आहे. मंत्री समितीने १५ आक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी.