अहिल्यानगर:सद्यस्थितीत ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे. स्वत:ची ऊस तोडणी मजुरांची टोळी असणे गरजेचे आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे भविष्यात केन हार्वेस्टिंगशिवाय दुसरा पर्याय नाही. केन हार्वेस्टरची किंमत जास्त आहे. त्यामुळे चार-पाच ट्रकधारकांनी मिळून केन हार्वेस्टर घ्यावे. तसे केल्यास] ऊस तोडणी मजुरांच्या भरवशावर राहावे लागणार नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकधारकांना कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी ज्याप्रमाणे सोयी सुविधा दिल्या त्या सुविधा यापुढील काळातही दिल्या जातील, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि.ची ५४ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी कंपनीचे चेअरमन आ. काळे बोलत होते.
यावेळी आ. काळे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणी मजुरांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. ऊस तोडणी मजूर आता इतर रोजगाराकडे वळत आहेत. त्यांना ऊस तोडणी करायची इच्छा नाही. त्यामुळे मजुरांची कमी होत चाललेली संख्या ही साखर उद्योगासाठी मोठी आव्हानात्मक बाब बनली आहे. केन हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करणे ही काळाची गरज झाली आहे. यावेळी, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी प्रास्तविक केले. कंपनीचे जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी अहवाल वाचन केले. संचालक विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. गौतम केन ट्रान्सपोर्टचे ज्येष्ठ संचालक छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, वसंतराव आभाळे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, दिलीपराव बोरनारे, श्रीराम राजेभोसले, मनोज जगताप, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सुधाकर रोहोम, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, उपस्थित होते.