बेळगाव : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे. ‘एआय’ तंत्रज्ञान गरजेचे बनले असून, ते बसविणाऱ्या शेतकऱ्यांना चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याकडून सबसिडी दिली जाणार आहे, अशी घोषणा केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. प्रभाकर कोरे यांनी केली. नगदी येथे कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे होते. एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती बारामतीत शरद पवार यांनी सुरू केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याकडे असा प्रयोग करण्याचा विचार असल्यास त्यांना कारखान्याकडून बारामतीचा अभ्यास दौरा करवून आणला जाईल असेही त्यांनी जाहीर केले.
कारखान्याचे संचालक अमित कोरे म्हणाले की, गेल्यावर्षी १०२ दिवस गाळप करून ९.९८ लाख टन ऊस गाळप केले आहे. त्याची ११.४६ रिकव्हरी आहे. कारखान्याला अनेक पुरस्कार मिळत आहेत. दर्जा व आधुनिकता यावर पुरस्कार मिळत असले तरी ते सर्व ऊस उत्पादक व कामगारांमुळे शक्य झाले आहे. हा गौरव शेतकऱ्यांचा आहे. संचालक महांतेश कवटगीमठ यांनी सभासदांना पंधरा लाखांचा अपघाती विमा देणारा कोरे कारखाना एकमेव असल्याचे सांगितले. मल्लिकार्जुन कोरे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यकारी संचालक डॉ. आर. बी. खंडगावे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक अजित देसाई, भरतेश बनवणे, नंदकुमार नाशिपुडी, संदीप पाटील, महावीर मिरजी, अण्णासाहेब इंगळे, भीमगौडा पाटील आदी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील यांनी स्वागत केले. एस. एल. हकारे यांनी सूत्रसंचालन केले. चेतन पाटील यांनी आभार मानले.