पुणे : श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचेही काम पूर्ण केले आहे. त्यामुळे कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५००० मेट्रीक टनावरून ७५०० मेट्रीक टन झाल्याने चालू गाळप हंगामात प्रतिदिन ८००० ते ८५०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होणार आहे. को-जनरेशन प्रकल्पांसह ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे. यंदा १३ लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केली. निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभात ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे संचालक सुरेशशेठ भिमाजी गडगे व त्यांच्या पत्नी अमृता गडगे यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे, असे सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. मंत्री समितीच्या बैठकीत गळीत हंगामाची तारीख जाहीर झाल्यावर कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते, इतर सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल असे ते म्हणाले. यावेळी व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सुमित्रा शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक, अधिकारी, कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.