सहवीज प्रकल्पाद्वारे भोगावती कारखान्याला उभारी मिळेल : सत्ताधारी आघाडी

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने काटकसरीचा कारभार करत सभासद हिताची वाटचाल सुरू ठेवली असून, डिस्टलरी विस्तारीकरण व इथेनॉल, सहवीज प्रकल्प राबवून कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर) यांनी केले. देवाळे तालुका करवीर येथे सत्ताधारी आघाडीच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे होते.

भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले की, ‘कारखान्याने काटकसरीच्या धोरणाने सभासद हित जोपासले आहे. दराच्या बाबतीत इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. भविष्यात उत्पादन क्षमता वाढवून डिस्टलरी विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवून कारखान्याचे कर्ज कमी केले जाईल. सभासदांना दीपावलीपूर्वी साखर व व्याजाची बिले दिली जाणार आहेत. यंदा साडेपाच लाख टन ऊस गाळप करण्याचा संकल्प असून आतापर्यंत ७५० करार झाले आहेत. यावेळी सर्व ऊस उत्पादकांनी कारखान्यास ऊस पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन सत्ताधारी आघाडीकडून सभासदांना करण्यात आले.

यावेळी विठ्ठल महाडेश्वर, भिवाजी पाटील, पी. एस. पाटील, बंडोपंत पाटील वाडकर, बाबासाहेब देवकर, सागर चौगुले, आनंदराव मगदूम, बाबासाहेब पाटील, जगन्नाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस क्रांतिसिंह पवार-पाटील, शिवाजी पाटील (तारळे), गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, मोहन पाटील, शिवाजी तळेकर, संदीप पाटील, वसंतराव पाटील (कंथेवाडी), भोगावतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, राऊसो बुगडे, राजू कवडे आर्दीसह कारखान्याचे व शिक्षण मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते. माजी उपाध्यक्ष राजू कवडे यांनी आभार मानले.

अनुत्पादक मालमत्ता विक्रीस शिवशाहू आघाडीचा विरोध…

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने कारखान्याची अनुत्पादक मालमत्ता विक्री करण्याचे ठरवले असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी याला जोरदार विरोध करावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी केले. कुरुकली (ता. करवीर) येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. हंबीरराव पाटील म्हणाले, सध्या भोगावतीचा प्रतिटन उत्पादन खर्च २६०० रुपये आहे, तर प्रतिटनासाठी १०९२ रुपयांचा व्याजाचा भार सोसावा लागत आहे. कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विरोधी आघाडी सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु त्याचबरोबर गैरकारभाराची शासनामार्फत चौकशी केली जाईल. यावर्षी कारखान्याला ७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील, भोगावतीचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील, मोहन धुंदरे, एम. आर. पाटील (कोथळी), राजू पाटील (हसूर), निवास पाटील (हळदी), बी. वाय. लांबोरे (बेले), मोहन पाटील (कोथळी), तानाजी जाधव (बाचणी), धीरज करलकर, सुभाष जाधव, अण्णाप्पा चौगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here