केंद्रीय सहकार मंत्रालयाचे साखर कारखान्यांना शेतकरी, मजुरांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश

कोल्हापूर : केंद्रीय सहकार मंत्रालयाने देशभरातील राष्ट्रीय साखर सहकारी कारखाना संघ, तसेच इतर सर्व सहकारी महासंघांना सदस्य कारखाने, सभासद शेतकरी आणि संबंधित मजुरांशी सातत्याने संपर्कात राहण्याचे निर्देश सोमवारी दिले. यामुळे कामकाजाबाबतची माहिती केंद्र सरकारला सतत मिळणार असून, साखर कारखान्यांच्या कामकाजावर केंद्रीय सहकार मंत्रालयाचा ‘वॉच’ राहणार आहे.

कारखान्यांनी शेतकरी व कामगारांशी संवाद वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा सक्रिय वापर करावा. या माध्यमांचा उपयोग केवळ सरकारी धोरणे आणि योजनांची माहिती देण्यासाठीच नाही, तर स्थानिक समस्या, उत्पादनातील आव्हाने आणि शेतकऱ्यांची मते आजमावण्यासाठीही व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.

या बैठकीत सहकारी चळवळीची दृश्यमानता वाढवण्यासाठी धोरण मजबूत करण्यावर भर देण्यात आला. नॅशनल फेडरेशनला ८.५ लाख सहकारी संस्थांपर्यंत योजनांची माहिती, तसेच विविध यशोगाथा व नवीन संस्थांची माहिती व्हॉटस्अॅप, ई-मेल, एसएमएस आणि प्रत्यक्ष संवादाद्वारे देण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत. याबाबत , साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले कि, साखर कारखानदारीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने टाकलेले उत्तम पाऊल, असे म्हणावे लागेल. यामुळे प्रश्न व त्यावरील उपायांबाबत ज्या त्यावेळी चर्चा होऊन अडचणी दूर होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here