अहिल्यानगर: संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ३९ कोटी ८८ लाखांच्या मुदत कर्जास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत राज्य शासनाकडून मदत करण्यात येते. त्या धोरणानुसार नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केदारेश्वर कारखान्यास हे कर्ज मंजूर करण्यात आले. या कर्जाच्या परतफेडीसाठी सात वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
शासन निर्णय जारी झाल्यानंतर सहा महिन्यांत कर्ज उचलण्याची मुदत दिली आहे. कर्ज ज्या कारणांसाठी घेतले आहे, त्याच कारणांसाठी वापरावे लागेल. कर्जफेड बाबतच्या प्रगतीची माहिती दर महिन्याला सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला द्यावी लागेल. देय हमीशुल्काचा भरणा १ एप्रिल वा १ ऑक्टोबर रोजी करावा लागेल. हमीशुल्क भरण्यास कसूर झाल्यास थकीत रकमेवर पहिल्या तीन महिन्यांसाठी १६ टक्के, तर त्या पुढील काळासाठी २४ टक्के दराने व्याज आकारले जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.