पुणे : कोर्झ टेक्नॉलॉजी या आयटी कंपनीने ‘ऊस एकरी १०० टन’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेच्या सभागृहात शनिवारी कृषी विभागाचे माजी संचालक दिलीप झेंडे यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले. कोर्ड्स टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद बनसोडे यांच्या संकल्पनेतून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. यापबाबत माहिती देताना बनसोडे म्हणाले की, ॲपमधून शेतकऱ्यांना ऊस लागवड, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आदी सर्व माहिती एका क्लिकवर मिळते.
शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीशी संबंधित समस्यांचे समाधानही या ॲपच्या माध्यमातून करण्यात येते. मुख्य तंत्र सल्लागार अमित बनसोडे यांनी ॲपविषयी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. माजी कृषी संचालक झेंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात वाढ साधता यावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी हे ॲप आहे. किफायतशीर असून आधुनिक शेतीसाठी हे ॲप मार्गदर्शक ठरेल. अक्षय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. संजय टिळेकर यांनी आभार मानले. यावेळी देसाई पतसंस्थेचे रामदास चौधरी, देविदास टिळेकर, सुभाष साठे, पोपट साठे, बाळासाहेब चौरे, शिवाजी कांचन, सुरेश सातव, सोमनाथ चौधरी, भाऊसाहेब चौधरी, महादेव चौधरी, आनंदा शितोळे, माजी कृषी अधिकारी राजेंद्र अकोलकर उपस्थित होते.