पुणे : नीरा-भीमा साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी १०० रुपयांचा हप्ता, अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांची घोषणा

इंदापूर : शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगाम, सन २०२५-२६ साठी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये झाली. यावेळी त्या बोलत होत्या. तर नुकत्याच संपलेल्या हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाला कारखान्याकडून दिवाळीपूर्वी प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाचा हप्ता दिला जाईल. हा हप्ता १० ऑक्टोबरपूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.वार्षिक सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्षा पाटील यांनी सांगितले की, कारखाना प्रतिदिनी पाच ते साडेपाच टन क्षमतेने उसाचे गाळप करणार आहे. कामगारांना दिवाळीनिमित्त एक पगार बोनस दिला जाईल.

यावेळी कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, की, कारखान्याकडून फेब्रुवारी महिन्यात गाळपास येणाऱ्या खोडवा उसास प्रतीटन ५० रुपये अनुदान दिले जाईल. उसाच्या ८६०३२ वाणाच्या लागणीस ३० रुपये प्रती टन अनुदान मिळेल. याशिवाय, कारखाना आडसाली, सुरू, पूर्व हंगामी, निडवा उसासाठी प्रत्येकी २१,०००, १५,०००, ११,००० रुपयांप्रमाणे १५ पुरस्कार दिले जातील. ऊस तोडणी, वाहतुकीसाठी सर्वोत्कृष्ट पुरवठादार ट्रॅक्टर, बैलगाडी, हार्वेस्टरसाठी प्रत्येकी एक पुरस्कार असेल. सभेत कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी आभार मानले. संचालक लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here