भीमा कारखान्यातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा : चेअरमन विश्वराज महाडिक

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन २ हजार ८०० रुपयांप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची उर्वरित ऊस बिलाची रक्कम देणे राहिली होती ती सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली.

भीमा कारखान्याकडे गत हंगामात गाळपास आलेल्या उसाची साधारण तीन कोटी ५२ लाख १७ हजार १७५ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे होती. ही सर्व रक्कम धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे चेअरमन महाडीक यांनी सांगितले.

भीमा कारखान्याकडे इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प नसताना ही भीमा ने आजपर्यंत उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर दिला. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कारखान्याचा येणारा गळीत हंगाम सक्षमपणे सुरू करून या हंगामातही उसाला सर्वांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चालू गाळप हंगामात कारखान्याने पाच लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक खालिद शेख, संचालक मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here