लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याने यंदा ७.५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी सर्व यंत्रणा सेवेत तत्पर राहतील. शेतकऱ्यांना कारखाना यंदाच्या गाळप हंगामात उसाला ३ हजार १५० रुपये प्रति मेट्रिक टन दर देणार आहे, अशी घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे केली. साखर कारखान्याच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार धीरज देशमुख, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे, त्र्यंबक भिसे, आबासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मांजरा परिवारातील साखर कारखाने उसाला सर्वाधिक भाव देऊन एफआरपीसहित रक्कम देत आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले, आमच्या परिवारातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून मांजरा परिवार कार्य करीत आहे. त्यामुळेच राज्यात मांजरा परिवाराचा नावलौकिक झाला आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम मांजरा परिवार करत आहे. केवळ साखर गाळप करणे यावरच न थांबता इतर उपपदार्थ तयार करून शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा प्रयत्न करत आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने साखर कारखान्यास हार्वेस्टर देण्याचे काम केले असून त्यातून अनेक शेतकऱ्यांना रोजगार देण्याचे काम जिल्हा बँकेने केले. यावेळी यशवंतराव पाटील, रेणा कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, अशोक काळे, श्याम भोसले, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, सचिन पाटील, जगदीश बावणे उपस्थित होते.