पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. संचालक मंडळाने याच गोंधळात पटलावरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर केले. मागील काही दिवसांपासून कारखान्याच्या जमीन विक्री संदर्भात शासनाकडून मिळालेल्या आदेशानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जमीन २९९ कोटी रुपयांना विकत घेणार आहे. या संदर्भात सर्वत्र माहिती मिळाल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तीचा विचार करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी याकडे निर्देश करत सर्व अटी-शर्तीच्या धरतीवर ही जमीन विक्री प्रक्रिया पार पाडावी, भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी या स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे सभासदांचे लक्ष लागले होते.
चेअरमन सुभाष जगताप यांच्या मनोगताने सभेस सुरुवात झाली. त्यांनी मागील १३-१४ वर्षात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला. कारखान्याच्या सभासदांच्या हितांच्या विचार करता आणि यशवंत कारखान्यास पुन्हा गतवैभवास प्राप्त व्हावे यासाठी सर्व संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा प्रयत्न करून शासन दरबारी आपल्या भूमिका मांडली. तसेच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून या निर्णयापर्यंत आपणास येता आल्याचे सांगितले.
ते म्हणाले, संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातून सुमारे १०० कोटी रुपये वाचवले असून बँकांच्या देण्यांचे ‘वन टाइम सेटलमेंट’ करून कारखान्याची सर्व जमीन मोकळी केली आहे. कार्यकारी संचालक कैलास अरे यांनी विषय पत्रिका सभेसमोर मांडली. सभासदांनी मंजुरीसाठी प्रत्येक विषयावर मतदान केले, मात्र यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभासद विकास लवांडे यांनी विषय पत्रिकेमधील मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे या अंतर्गत वाचन केलेले काही विषय अधोरेखित केले. जी सभा केवळ ५ ते १० मिनिटात उरकण्यात आली, त्या सभेचा इतिवृत्तांत वाचण्यासाठी आज २० ते २५ मिनिटे लागतात यावरून हे विषय आम्हांस मान्य नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी कारखान्याच्यामालकीची जी जमीन विकायची आहे ती अहवालात दिलेल्या गट क्रमांक आणि प्रत्यक्ष संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत दिलेल्या अंडरटेकिंगमधील गट क्रमांकमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्यावर चेअरमन जगताप यांनी अहवालातील प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. यावर अनेक सभासद हसले. कृषी उत्पन्न बाजार समिती विकण्यात येणाऱ्या जमिनीचा दर परिसरातील सद्यस्थितीला अनुसरून नसल्याने कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे लवांडे यांनी निदर्शनास आणून दिले तसेच संचालक मंडळ अनेक गोष्टी सभासदांपासून लपवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.