पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्यावर असलेले सर्व बँकांचे कर्ज वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) करुन फेडण्यात आले आहे. त्यामुळे कारखान्याचा १०५ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आता कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवर कुठल्याच बँकेचे कर्ज नाही. माजी संचालक व तज्ज्ञांची समिती बनवून त्यांच्या मार्गदर्शना नुसार आगामी काळातील सर्व निर्णय पारदर्शकपणे घेतले जातील अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केली.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. काहींनी केलेल्या गोंधळात विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. काही ठराविक सभासदांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र बहुतांश सभासदांनी आक्रमक पवित्रा घेत संचालक मंडळाला पाठिंबा दिला. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या ठरावानुसार कारखान्याचे नाव श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना असे करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी गार्डन, मुरकुटे वस्ती, कोलवडी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ माजी संचालक पांडुरंग काळे, प्रताप गायकवाड, बाळासाहेब चौधरी, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, हवेली कृषी बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, संचालक प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी तसेच कारखान्याला देणगी व बिगरव्याजी ठेव दिलेल्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. प्रभारी कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी अहवाल वाचन केले. संचालक संतोष कांचन यांनी आभार मानले.