पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गाळप हंगाम नेमका कधी सुरु होणार ? याकडे साखर उद्योगाच्या नजर लागल्या आहेत. सुरुवातीस 15 ऑक्टोंबरला हंगाम सुरु करण्याची मागणी होत होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पूरस्थिती कायम असल्यामुळे आता 25 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबरपासून हा हंगाम सुरु होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे हंगाम उशिरानेच सुरु करण्याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दैनिक ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम 2025-26 मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीची बैठक प्रथम 22 सप्टेंबर, नंतर 29 सप्टेंबरला निश्चित झाली होती. आता ती सोमवारऐवजी मंगळवारी (दि.30) मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर मंत्रालयात दुपारी दीड वाजता होणार आहे. मंत्री समितीची बैठकीची वेळ तिसऱ्यांदा बदलली आहे. आता मंगळवारी ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
साखर आयुक्तालयातून चालूवर्षी ऊस पिकाखाली किती क्षेत्र असून प्रत्यक्षात गाळपासाठी किती ऊस उपलब्ध होईल, याची नेमकी आकडेवारी मंत्री समितीच्या बैठकीतच दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. कृषी विभागासह साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांच्या विभागवार बैठका घेऊन येणारे ऊस क्षेत्र व उपलब्धतेचा आकडा निश्चित होईल.
शिवाय मिटकॉन संस्थेबरोबरही आयुक्तालयाने उसाच्या अचूक उपलब्धतेसाठी सामंजस्य करार केलेला आहे. त्यातून गतवर्षी प्रत्यक्षात उसाच्या उपलब्धतेचा आणि गाळपाचा अंदाज चुकलेला होता. त्यामुळे यंदा नेमका किती ऊस उपलब्ध होईल, हे चित्र मंगळवारी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कृषी विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार 12 ते 13 लाख हेक्टरवर ऊस पीक उभे आहे. गूळ-खांडसरी, रसवंती आणि ऊस बेण्यासाठी जाऊन साखर कारखान्यांना प्रत्यक्षात 1200 ते 1250 लाख मेट्रिक टनाइतक्या उसाची उपलब्धता गाळपासाठी राहण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.